सह्याद्री




गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे

आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे....

--श्रीकांत लव्हटे


     खरंच दु्र्ग पहावेत  ते सह्याद्रीचे... रांगडे, दुर्गम तितकेच प्रेमळ, मनाला सुखावणारे...शतकोनशतके हा सह्याद्री एखाद्या आजोबांसारखा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतोय. किती पिढ्या, किती राजवटी, किती सत्तांतरे पाहीलेत याने... वर्षानुवर्षे सगळ्या घडामोडी बघत, पावसाळे उन्हाळे सोसत उभा आहे. शिलाहार, भोज, मराठे या राजवटींनी याला गडकोटांचे अलंकार लेवविले. दुर्गभंजक इंग्रजांनी ते ओरबाडले. सह्याद्री सगळी सुख दुखे घेऊन उभा आहे.



     आपण जावं, शांत त्याच्या जवळ बसावं आणि त्याची सुख दुखे ऐकावीत. कोणी कुठे आसुदं सांडली, कोणी कुठे तलवार गाजविली, कुठे तोफेच्या गोळ्यांनी तट-बुरुजांना खिंडारे पाडली, कधी-कशी आजुबाजुच्या गावांनी परकीय आक्रमणे झेलली सगळं सगळं काही सांगतो तो!!


     सह्याद्री शिकवतो कळसुबाईसारखे उंच व्हा... मसाईच्या पठारासारखे मोठे विस्तीर्ण मन असु द्या...कठीण प्रसंगी ठाम उभे रहा...जसा मी उन वारा पाऊस अंगावर घेतो तसा येणा-या संकटांना निधड्या छातीने तोंड द्या...बाहेरुन रांगडे असला तरी आतले माणूसकीचे झरे आटू देऊ नका...मोठे व्हा पण मोठेपणा मिरवू नका...


    सह्याद्री भरभरुन देतोय... या... नेढ्यातल्या वा-याचा भरार अंगावर घ्या.... सह्याद्रीच्या पोटातल्या झ-यांचे थंडगार पाणी प्या...गडकोटांच्या अवशेषांत इतिहास शोधा...रणभूमींवर गेल्यावर धमन्यांत सळसळणारे रक्त जगा...घाटवाटा फिरुन इतिहासाचे बारकावे पहा...सह्याद्री भरभरुन देतोय... या..शिका..मोठे व्हा....



© श्रीकांत लव्हटे
shrikant.lavhate@gadkot.in
Sahyadri

Comments

Popular posts from this blog

जावळीच्या मोरेंची बखर : सारांशलेखन

दसरा | शिलंगण

साष्ठीची बखर : सारांशलेखन